उपवास (#12504)

हे स्वामी, माझ्या परमेश्वरा, तुझे स्तवन असो. ज्या साक्षात्काराद्वारे अंध:कार प्रकाशात परिवर्तित झाला, ज्यामुळे गजबजलेले मंदिर बांधण्यात आले, लिखित पत्रिका प्रकट झाली आणि पसरलेल्या पत्रिकांचा गुंडाळा उघड झाला, त्याद्वारे मी तुझी याचना करतो की मला व माझ्या सोबत असलेल्यांना असे वरदान दे जे तुझ्या सर्वव्यापी वैभवाच्या स्वर्गामध्ये उड्डाण करण्यास आम्हास समर्थ करील आणि जे आम्हाला संशयांच्या अशा कलंकापासून धुवून काढील ज्यांनी शंका करणाऱ्यास तुझ्या एकतेच्या सभामंडपात प्रवेश करण्यास प्रतिबंध केला आहे.
	हे माझ्या स्वामी, मी असा एक सेवक आहे ज्याने तुझ्या प्रेमळ दयेचा दोर घट्ट पकडला आहे आणि तुझी कृपा आणि अनुग्रह यांच्या किनारीस बिलगला आहे. माझ्यासाठी आणि माझ्या प्रियजनांसाठी इहपरलोकीचे कल्याण निर्धारित कर. नंतर तुझ्या प्राणीमात्रांमधील अति निवडकांसाठी निर्धारित केलेली रहस्यमय भेट त्यांना प्रदान कर.
	हे माझ्या स्वामी हेच ते दिवस आहेत जेव्हा तू तुझ्या सेवकांना उपवास पाळावयाची आज्ञा केली आहेस. तो आशीर्वादित आहे जो सर्वस्वी तुझ्याकरिता आणि तुझ्या व्यतिरिक्त अन्य सर्व वस्तूंपासून निखालस अनासक्त राहून उपवासाचे पालन करतो. हे माझ्या स्वामी, मला व त्यांना तुझे आज्ञापालन करण्यास व तुझे नियम पाळण्यास सहाय्य कर. खरोखर तू जे निवडतोस ते करण्याचे तुला सामर्थ्य आहे. 
	तुझ्या व्यतिरिक्त सर्वज्ञाता, सर्वबुद्धिमान अन्य परमेश्वर नाही. सर्व विश्वांच्या स्वामीच्या परमेश्वराचा जयजयकार असो.

-Bahá'u'lláh
-----------------------

